एक सांज नात्याची....



तो उगाच उदास वाणा बसलेला, उगाच असेल का पण? नाही त्याच्या मनात असतील असंख्य प्रश्न. कारण एरवी सर्वांना घेऊन चालणारा तो आज असा का वागतोय अचानक. नक्कीच काहीं तरी बिनसलंय. मी सहज म्हणून त्याला बोललो.
“कसा आहेस...”
त्याच्या डोळ्यात टचकन पाणी तरळलं, मला कळला त्या पाण्या मागचा अर्थं पण मी तरी काय करणार होतो त्याच्या साठी. 
पण न कळत तो बोलून गेला.
"तुला माहितीये मित्रा गेली चार महिने या एकाच प्रश्नाची आस ठेऊन जगत आहे रे मी, कि एकदाच फक्त एकदा तिने म्हणावं.
“कसा आहेस..” आणि मी मौनातुनच बोलावं “तुझ्या शिवाय कसा असेन..” तिने माझं मौन ओळखावं अलगद डोळ्यातल्या पाण्याला स्वतःच्या हाताने टिपाव. आणि.."
'आणि काय...'
"नाही काहीच नाही."
'मोकळा झालास बोलून तर सुटशील.'
"मला मघार घ्यायची नव्हतीच कधी पण..."
बोलता बोलता तो अडखळला. त्याला आलेला आवंढा त्याने तितकाच शिताफीने गिळला, मी जवळ जाऊन ताच्या खांद्यावर हात ठेवला त्याचा तोल गेला, म्हणाला 
"मित्रा जिवंतपणा हरवलाय रे.."
मी म्हाणालो “तुझे हे प्रश्न नाही रे कळत मला, थोडा सरळ बोलशील.”
“सरळ चालायचा प्रयत्न केला होता खूप दा, जीव तोडून मना पासून विश्वास ठेवून होतो. पण तिला अपेक्षित होतं तिनं वाऱ्या प्रमाणे मोकळं राहावं, मनात येईल ते करावं. आपण चांगल तर जग चांगल या व्याक्य भवती फिरत होती ती पण तिला कोण सांगणार कि आपण जितकं चांगलं तितकं लोक आपलाच उपभोग घेणार म्हणून.”
तो आज फार गोंधळलेला होता त्याला कळत नव्हतं नेमकं काय होतंय ते, तो शब्द उधळत होता त्याचे अर्थ त्याला तरी लागत असतील का कुणास ठाऊक.
त्याचा वाढलेला श्वास बघून मी चिडलोच.
'वेड लागलंय का तुला.'
हो वेडच लागलंय, मला अपेक्षित नव्हताच कधी हा शेवट आमच्या नात्याचा. मला तिने माझ्यावर केलेला प्रत्येक आरोप मान्य होता, मी कधीच अमान्य केली नाही माझी कुठलीच चूक. पण तिने तरी का प्रत्येक वेळेस हट्ट धरावा. डाव मांडायचा निर्णय तिने घ्यायचा मोडायचा निर्णय तिनेच घ्यायचा आणि त्यात मधल्या मध्ये माझी घुसमट होत होती याची साधी जाणीव सुद्धा तिला कधी नाही झाली. फार माफक अपेक्षा होत्या रे माझ्या, मुळात नात्यात अपेक्षा नकोत असं म्हणतात पण हाताची पाचही बोटं सारखी नसतात ना. जसं तिला माझ्या कडून अपेक्षित होतं तसचं काहीसं मला.....”
तो बडबडू लागला आणि मी स्तब्ध होऊन फक्त ऐकत होतो. काय समजवावं आणि काय नको यात आता माझाच पुरता गोंधळ झालेला. तरी हिम्मत करून बोललो.
'हे बघ तिला तिचा मार्ग मोकळा हवा होता, तू का परत परत तिच्यात अडकून पडलायस.'
“कारण मी कधीच तिच्यातून बाहेर निघालो नाही, मग अडकून जाण्याचा प्रश्नच येत नाही.”
त्याचं असंबद्ध बोलणं खरंतर मला असह्य होत होतं, पण मलाच कळेना याला नेमक काय सांगावं कसं समजवावं.
'चल फिरून येऊ.'
“त्याने काय होईल.”
'रेफ्रेश होशील जरासा..'
“कदाचित हो, कदाचित नाही..”
मला कळेच ना याला नेमकं काय म्हणावं, माझ्या प्रत्येक प्रश्नाला त्याचा कडे प्रतिप्रश्नच होता उत्तर कसलंच नव्हतं. माझाच गोंधळ होत होता. ताची केविलवाणी धडपड बघून आता तर मी स्वतःच खचतो कि काय असे वाटायला लागले होते.
“मी आत्महत्या करू का रे?”
त्याच्या या शब्दांनी मनावर एक जोरदार घाला घातला, नकळत हात उठला त्याच्यावर. कसलाच विचार नं करता दिली ठेऊन. त्याच्या डोळ्यातलं पाणी कडेला येऊन थांबलं, एक टक माझ्या कडे तो बघत होता. माझ्याडोळ्यातली चीड त्याला नक्कीच पूर्णपणे जाणवली असावी.  त्याचं काहीच न एकता मी त्याला गाडीत बसवलं आणि मार्ग मिळेल तसा सुसाट त्याला घेऊन गेलो.
“खूप कोंडी होते आहे रे माझी..”
'कुणा साठी, कशा साठी.. या आई बापाने तुला इतका मोठा केला त्यांना विसरून तू स्वतःला संपवायचा विचार करतोय.'
“अरे पण ती..”
'काय ती ती, हे बघ आता बसं झालं, जे झालंय ते तुला विसरायला लागेल. त्या शिवाय दुसरा पर्याय पण नाहीये तुझ्या कडे.'
आता मात्र मी बोलत होतो आणि तो स्तब्ध होऊन सगळं ऐकत होता....
Protected by Copyscape Online Infringement Checker                                                                                                            क्रमशः....

Comments

Popular posts from this blog

तो एक बिनधास्त .....

"कुणास ठाऊक"....